कोलाडमध्ये पोलीसांना लागलेत भंगाराचे डोहाळे?
बेकायदा भंगाराचे अड्डे वाढतच चाललेत
भंगार व्यावसायिकांकडून पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता?
कोलाड : निलेश महाडीक
कोलाड परिसरात बेकायदा भंगाराच्या अड्ड्यांना उधाण आलेले असून या परिसरात पोलीसांच्या आशिर्वादाने बेकायदा भंगाराचे अड्डे दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत असून येथील पोलीसांना भंगाराचे डोहाळे लागलेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
कोलाड परिसर, भिरा फाटा, पुगाव, पुई, महाबळेपाळा येथे बेकायदा भंगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून हा अवैध व्यवसाय कोलाड पोलीसांच्या आशिर्वादाने सुरू असून लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन कोलाड पोलीसांनी ह्या बेकायदा भंगाराच्या अड्ड्यांवर वरदहस्त ठेवल्याचे बोलले जात आहे. गेली वर्षानुवर्षे येथे अवैध भंगाराचे अड्डे सुरू असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे.
या परिसरात बेकायदा भंगाराचे अड्डे चालविणाऱ्यांनी आपली दहशत निर्माण केलेली असून त्यांच्या भितीमुळे सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी रायगड पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष केंद्रीत करून येथील बेकायदा भंगाराचे अड्डे तातडीने बंद करावेत व या अवैध व्यवसायाला अभय देणाऱ्या येथील स्थानिक पोलीसांवरच प्रथम कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment