अलिबाग (जिमाका) शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2022 रोजी हयात असल्याबाबतचे “हयात प्रमाणपत्र” (Life Certificate) दि.1 ते दि.30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रमेश इंगळे यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकाचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. ही घोषणापत्रे संबंधित बँकांकडे पाठविण्यात आलेली आहेत. पुनर्नियुक्त/ पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन / निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वत:चे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी.
तसेच अधिक माहितीकरिता रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रमेश इंगळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment