दक्षता जनजागृती अभियानांतर्गत “भ्रष्टाचार मुक्त भारत, विकसित भारत” विषयाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक सुषमा सोनवणे यांनी केले मार्गदर्शन
अलिबाग (जिमाका):- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या वतीने स्पर्धा विश्व अकॅडमी, रायगड-अलिबाग येथे विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना “दक्षता जनजागृती” अभियानांतर्गत भ्रष्टाचार व कुठल्याही प्रकारची लाच यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक सुषमा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उप अधीक्षक सुषमा सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कुठल्याही प्रकारे लाच देणे व लाच घेणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. कुठलाही सरकारी दाखला आपण लाचेशिवाय मिळविणे, हा आपला अधिकार आहे. शासकीय योजना प्रत्येकासाठी असतात मग त्या योजनेच्या लाभाकरिता आपल्याला कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नसते. म्हणूनच गरज पडल्यास अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचे दाखले काढताना किंवा इतर शासकीय काम करताना कुठल्याही कार्यालयातील कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी पैशाची केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करू शकता. आपण केलेल्या तक्रारीची खातरजमा केल्याशिवाय संबंधित कारवाई होत नसते. मात्र लाचेशिवाय आपले काम करून घेणे, हे आपले कर्तव्यच आहे.
प्रत्येक स्तरावर आपल्याला विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते त्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन ते दाखले काढल्यास कमी खर्चात आपण ते दाखले मिळवू शकतो. अगदी लहानात लहान गोष्टीपासून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत आपला शासकीय कार्यालयांशी संबंध येत असतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारची लाच देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास आणि सत्यता समोर आल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशा प्रकारची माहितीही उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका उपस्थितांना विचारल्या व त्यासंदर्भात त्या शंकांचे उत्तमरित्या निरसन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील तथा अलिबाग तालुक्यातील विविध भागातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment