जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करावी
मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत
अलिबाग (जिमाका) :- निर्यातक्षम आंबा बागांच्या नोंदणीकरिता मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दि.१ डिसेंबर पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी अपेडामार्फत फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप उपलब्ध केलेले आहे. हे अॅप डाऊनलोड करून नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. रायगड जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये १ हजार ९७२ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली आहे.
निर्यात आंबा बागांची नोंदणी ५ वर्षासाठी वैध असेल. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सन २०२२-२३ या वर्षासाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२, ८ अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment