डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत कार्यक्रम
रायगड : सचिन सागळे
कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे ९० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन या महाविद्यालयाचे प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अतुल साळुंखे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल , प्रा. सुकुमार पाटील, प्रा. अनंत थोरात, प्रा. शिल्पा खाडे, प्रा. वैशाली कानावडे, श्रुष्टी फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुखद राणे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेच्या अध्यक्षा व कवयित्री संध्या दिवकर, कवी हणमंत शिंदे, श्री.पाणावकर सर, हेमंत बारटक्के, प्रणय इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रणय मनोहर यांनी, "आत्मविश्वास आणि मी" या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधला तर हेमंत बारटक्के यांनी "सूत्रसंचालन कसे करावे"! या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधला. याच कार्यक्रमात कवयित्री संध्या दिवकर, कवी हणमंत शिंदे, पाणावकर सर, हेमंत बारटक्के व प्राध्यापक सुकुमार पाटील यांनी बहारदार शैलीत कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता या महाविद्यालयाचे प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अतुल साळुंके यांच्या प्रबोधनपर मार्गदर्शनाने झाली. त्यांनी मराठी भाषेची उत्पती, व्याप्ती महत्व आदी महत्वपूर्ण मुद्यांना हात घालत मराठी भाषा संवर्धन हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असे सांगत या कमी आपणा सर्वांचाच हिरीरीने सहभाग घेणे आवश्यक उपस्थितांना आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सुकुमार पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अखंड मेहनत घेतली.
Comments
Post a Comment