माणगांव तालुक्यातील नागरिकांनो सावधान..!!
लोन देतो असे सांगून एखादा भामटा तुमची फसवणूक करू शकतो
माणगांव (प्रतिनिधी) :- लोन (कर्ज) देतो असे सांगून रायगड जिल्ह्यात फसवणूक करणाऱ्यांनी सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलेला असून भरमसाठ रक्कमेचे कर्ज जलद गतीने देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करण्यास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष करून माणगांव तालुक्यातील नागरिकांनी याबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे आणि लोन देतो अशी बतावणी करणाऱ्या कुणालाही आधी पैसे देऊ नये! कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
अनेक बेरोजगारांना, तसेच गरजवंतांना व्यवसायासाठी मोठ्या रक्कमेच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यांपैकी अनेकजण नामांकीत बँकांकडे कर्जाची मागणी करतात. तर काहीजण झटपट कर्ज मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि शॉर्टकट मार्गाने जाऊन स्वतःची फसवणूक करून घेत असतात. अशाच प्रकारे मोठ्या रक्कमेचे कर्ज मिळविण्यास इच्छुक असणाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी काही "लुटारू" टपून बसलेले असतात. कर्जाची गरज असलेल्या एखाद्या गरजू माणसाला शोधण्यात हे "लुटारू" चांगलेच पटाईत असतात.
ज्यांना कर्जाची गरज आहे अशा माणसांना लुबाडणाऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलेला असून प्रथम प्रोसेसिंग फी च्या नावाखाली ३० ते ५० हजारांची रक्कम घेतली जाते. पण अनेक महिने होऊन देखील कर्जाचा थांगपत्ता नसतो! अर्थात, येथे फसवणूक झालेली असते. म्हणून अशा प्रकारे कर्ज मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्यांना कुणीही पैसे देऊ नयेत व त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे माणगांव तालुक्यातील नागरिकांनी याबाबत विशेष दक्षता घेऊन सावध राहणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment