9 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन
होणार दि.21 जून रोजी साजरा
रायगड : सचिन सागळे :- जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, आरोग्य संपन्न करणारे शास्त्र म्हणजे “योग”. 21 जून या “ जागतिक योग दिनाच्या” निमित्ताने भारताबरोबरच अनेक देशांमध्ये 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने वसुधैव कुटुंबकम या पार्श्वभूमीवर आधारित “One World One Health हा या वर्षीचा विषय आहे. स्वतः बरोबर पूर्ण जगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य योग च्या माध्यमातून संतुलित करणे हा वैश्विक उद्देश या मागे आहे.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्य साधारण लाभांमुळे सर्वत्र जगामध्ये योग आज लोकप्रिय आहे. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला. सर्व जग करोनाच्या विळख्यात अडकलेले असताना भारतातील अनेक योग प्रशिक्षकांनी “हे विश्वाची माझे घर” हाच विचार ठेवून सर्वत्र जगामध्ये योग प्रशिक्षण दिले. विशेषत: मानसिक बळ वाढविण्यासाठी याचा उपयोग झाला.
श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुप्फूसाना बळकटी देणारी ‘जलनेती’ ही शुद्धीक्रिया करोना काळात सर्वांसाठी फायदा देणारी ठरली. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांनी आणि डॉक्टर्सनि सुद्धा याचा सराव केला. यावर शास्त्रीय संशोधन झाले आणि आजही सुरु आहे. शितली शित्कारी सारखी शरीराचे तापमान संतुलित ठेवणारे, उष्णतेच्या विकारांवर प्रभावी असणारे प्राणायाम, मानसिक स्वास्थ्य प्रदान करणारे महत्वाचे अंग म्हणजे ‘ध्यान’ यावरही राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय, पातळीवर संशोधन करण्यात आले.
योग कडे फक्त व्यायाम म्हणून न बघता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत एक जीवनशैली म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे. दिवसाची सुरवात प्रार्थनेने करून सूर्यानमस्कार घालणे, विविध प्रकारची आसने करून स्थिरता अनुभविणे, दृढतेसाठी प्राणायाम आणि ध्यान अशा जीवनशैलीमुळे माणसाचा प्रवास मनाच्याही पलीकडे चित्त प्रदेशाकडे होतो. यम नियमातील मानसिक - शारीरिक स्वच्छता, संतोष, तप, स्वतःच्या आचरणाचा अभ्यास करणे, आणि ईश्वराचे चिंतन यामुळे मनुष्य आपोआपच आधात्मिक अनुभूती घेतो.
योग हे आपले प्राचीन शास्त्र आहेच, पण त्याचबरोबर आयुर्वेद, युनानी यांचा प्रसार देखील भारत सरकार पूर्ण जगभरात करत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी भारत सरकार खेडेगावातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, शाळा, सरकारी कार्यालयांपासून, बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत जागतिक योग दिवस साजरा करीत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये झालेल्या योग प्रचाराचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की, योग प्रशिक्षणाची मागणी सर्वत्र वाढत आहे, योग कडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योग शास्त्रामध्ये आहे, आपण सर्वांनी भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या शास्त्राचा आदर करून योग जीवन शैली आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे आणण्याचा प्रयत्न करू या. उर्जा आणि सकारत्मकता प्राप्त करून देणारे योग शास्त्र काही वर्षांनी जगाच्या इतिहासामध्ये ‘जागतिक शांतीदूत’ म्हणून नक्कीच संबोधले जाईल.
Comments
Post a Comment