म्हसळा पोलीस करतात अवैध धंद्यांची दलाली
येथील पोलीसांनी पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली?
रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे अवैध मटका जुगाराचा धुमाकूळ सुरू असून येथील प्रभारी पोलीस अधिकारी संदीपान सोनावणे यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.
कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलीसांची भूमिका महत्वपूर्ण असते. परंतु जर पोलीसच अवैध धंद्यांना साथ देत असतील तर...? हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे, असै म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच्या परिस्थितीत महाराष्ट्र पोलीसांनी "एक कार्यक्षम पोलीस दल" म्हणून लौकीक मिळविलेला आहे. पण काही "खादाड" वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल नाहक बदनाम होत चालले आहे.
म्हसळा येथे अशीच परिस्थिती असून येथील पोलीसांनी अवैध धंद्यांना साथ देऊन पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांना अवैध धंद्यांचा लाखो रुपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
म्हसळा येथील कुंभारवाडा येथे बेकायदा मटका जुगार आणि व्हिडीयो गेम, बाजारपेठ येथे मटका जुगार एसटी स्टँड येथे मटका जुगार, दिघी रोड येथे मटका जुगार असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून बारटक्के, छेडा आणि विचारे या तिंघांनी हे अवैध धंदे सुरू ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. या अवैध धंद्यांकडून दर महिन्याला म्हसळा पोलीसांना लाखो रूपयांचा फफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? या प्रश्नामुळे या परिसरात पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत.
महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. कारण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांच्यावर कारवाई झाली तरच येथी अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment