स्वामित्व योजना ड्रोनव्दारे गावठाण मोजणी प्रकल्पाची केंद्रीय पथकाकडून तपासणी
अलिबाग : प्रतिनिधी :- स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन हा महत्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वीरीत्या सुरु आहे. या प्रकल्पास संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायती राज, भारत सरकार, दिल्ली चे अवर सचिव श्री. अविनाश चंदर तसेच त्यांचे सल्लागार श्री.शिवम रंजन, श्री.वात्सल्य मालवीय यांनी स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण ड्रोन भूमापन झालेले मौजे सागाव, ता.अलिबाग या गावाची पाहणी केली. येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे झालेल्या सर्व्हेचा ग्रामस्थांना काय लाभ झाला, याबाबत ग्रामस्थांचे मत जाणून घेतले.
यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सचिन इंगळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद श्री.राजेंद्र भालेराव, तसेच खंडाळा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री.शेखर बळी, उपसरपंच अशोक थळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष कलगुटकर हे उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांनी आम्हाला मालकी हक्काचा पुरावा मिळाल्यामुळे शासनातील विविध योजनांचा लाभ भविष्यात होईलच याबरोबरच हद्दीबाबतचाही वाद संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ड्रोनबाबत चांगल्या प्रकारे काम केले असल्याचे ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले.
उपअधीक्षक भूमी अभिलेख, अलिबाग या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग तालुक्यातील 141 गावांचा स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे पूर्ण झाला आहे. साधारणत: 111 गावांचे चौकशी काम पूर्ण झाले आहे. तसेच चौकशी कामानुसार एकूण 23 गावांची सनद (मालकी हक्काचा पुरावा हा) तयार झाली असून सर्व घरमालक/धारकांना सनद वाटपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करुन सर्वाना सनद वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
शेवटी उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री.भोलाशंकर कोकणे यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment