पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सूत्रे
रायगड (आशिष शेळके) :- नुकत्याच झालेल्या पोलीस दलातील बदल्यांमध्ये रायगड जिल्ह्यात अनेक नवीन पोलीस निरीक्षक लाभलेले आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील फायर ब्रँड नावाने ओळखले जाणारे तसेच गुन्हेगारी जगात वचक निर्माण करणारे धडाडीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची रायगड गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बाळासाहेब खाडे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील कामगिरी बघत त्यांना रायगड जिल्ह्याच्या क्राईम ब्रँचमध्ये नियुक्ती दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना अनेक मोठ्या कारवाई करीत चंद्रपूर जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गुन्हेगारी जगतावर चांगलाच धाक बसवला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील मर्डर, वरोरा तालुक्यातील तेंबुर्डा येथील बँक रॉबरी, मुल तालुक्यातील २२ लाखांची जबरी चोरी, बल्लारपूर येथील चर्चित बहुरिया हत्याकांड, दुर्गापूर येथील मेश्राम हत्याकांड अशा अनेक गुन्ह्यांत फास्ट ट्रॅक सारखे आरोपी त्यांनी अटक करीत धडाकेबाज कामगिरी दाखवली. चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे पाळेमुळे तोडत त्यांनी क्रिकेट बुकी ते सुगंधित तंबाखू यांसारख्या बेकायदा धंद्यांवरती आक्रमक कारवाई करत गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वी ठरवत दमदार कामगिरी केली.
त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक पदाची सूत्रे मिळाली आहेत.
Comments
Post a Comment