तळा तालुक्यातील राहाटाड येथे “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत लाभार्थीना परसबाग भाजीपाला मिनी किटचे वाटप
रायगड : सचिन सागळे :- सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेची सुरुवात तळा तालुक्यातील प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
“शासन आपल्या दारी” या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा हाच आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी जात आहेत. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी हे अभियान तालुक्यात राबविण्यात येत आहे.
योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. सर्व प्रशासनाकडून 'हर घर दस्तक' च्या माध्यमातून प्रत्येकाला योजनांची माहिती देण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून राहाटाड येथे कृषी विभाग व महसूल विभाग तसेच पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सर्वप्रथम या गावचे कृषी सहाय्यक चंद्रकांत पाडगे यांनी “शासन आपल्या दारी” या योजनेची संकल्पना व उद्देश या विषयी माहिती सांगितली. त्यानंतर सहाय्यक तंत्र व्यवस्थापक सचिन लोखंडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया व परसबागेतील भाजीपाला लागवडी पासून ते काढणी पर्यँत तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले. तसेच तळा तालुक्याचे मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांची फळबाग लागवड, मागेल त्याला काजू, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा,पीक विमा, पॅक हाऊस, पीएम किसान या योजनांची माहिती दिली व भात व फळबाग लागवड नवीन तंत्रज्ञान या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच मग्ररोहयो फळबाग लागवड,मागेल त्याला काजू, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, परसबाग भाजीपाला किट इत्यादी लाभार्थींची निवड केली.
राहाटाड गावच्या तलाठी शामली सतांबेकर यांनी 7/12, उत्पनाचे दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखले, रहिवासी दाखले तसेच इतर योजनांच्या लाभार्थींची निवड केली. यानंतर गावचे सरपंच मिताली करंजे यांच्या हस्ते लाभार्थीना परसबाग भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच मिताली करंजे, सदस्य पांडुरंग गवाने, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, सहाय्यक तंत्र व्यवस्थापक सचिन लोखंडे, तलाठी शामली सतांबेकर, कृषी सहाय्यक चंद्रकांत पाडगे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment