"शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत शैक्षणिक दाखले वाटप शिबिराचे आयोजन
रायगड : सचिन सागळे :- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व तहसिलदार समीर घारे यांच्या पुढाकारातून “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय, म्हसळा मार्फत शनिवार, दि.17 जून 2023 रोजी पंचायत समिती सभागृह, म्हसळा येथे शैक्षणिक दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार समीर घारे यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, जातीचा दाखला, डोमासाईल, नॅशनॅलिटी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
शासकीय दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- उत्पन्नाच्या दाखल्यासाठी- तलाठी उत्पन्न दाखला, शेती असल्यास 7/12 व 8 अ, नोकरी असल्यास फॉर्म नं.16, पेन्शन असल्यास पासबुक, रेशन कार्ड, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्रासाठी -: तहसिलदार उत्पन्न दाखला (3 वर्षांच्या उत्पन्नासहित), जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
जातीच्या दाखल्यासाठी -: शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला (ओबीसी साठी 1967 पूर्वीचा पुरावा, एन.टी साठी 1961 पूर्वीचा दाखला, एस.सी साठी 1950 पूर्वीचा पुरावा), आजोबा, चुलते, आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जात नमूद असलेल्या जन्म नोंदीचा उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो, प्रतिज्ञापत्र नमूना 2, प्रतिज्ञापत्र नमूना 3.
डोमासाईल नॅशनॅलिटी प्रमाणपत्रासाठी -: शाळा सोडल्याचा दाखला, तलाठी रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
तरी नागरिकांनी शिबिराला येताना आपल्याला ज्या शासकीय दाखल्याची आवश्यकता आहे, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार समीर घारे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment