“शासन आपल्या दारी..!”
प्रधानमंत्री कुसुम योजना : दिवसाच्या मोफत वीजेमुळे शाश्वत सिंचनाची सोय
अलिबाग : प्रतिनिधी :- कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या या लेखातून...
शेती करताना शेतकऱ्यांना वीज अखंडपणे मिळावी म्हणून सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे.
राज्य शासनाकडून महाकृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जात असून, पिकांना पाण्याची आवश्यकता असते वेळी शेतकरी पाणी देऊ शकणार आहे. हे या योजनेचे मुख्य फलित राहणार आहे. सिंचित क्षेत्रामुळे शेतकऱ्याला दिवसा मोफत व अखंड वीज मिळण्याची सुविधा उपलब्ध होत आहे.
केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि.22 जुलै, 2019 रोजी पीएम-कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
राज्य शासनाने 12 मे, 2021 रोजी या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेंतर्गत दरवर्षी 1 लाख नग या प्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5 लक्ष सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.
अटल सौर कृषीपंप योजना-1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषीपंपासाठी अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येणार आहे, तशी स्पष्ट सूचना पोर्टलवर फॉर्म भरताना दिली जाते.
लाभार्थी हिस्सा-पीएम कुसूम योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत.
पीएम कुसूम योजनेंतर्गत 3 एच.पी. पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह 1 लाख 93 हजार 803 असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 19 हजार 380, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 9 हजार 690 इतका राहील. कृषिपंप 5 एच.पी. पंपासाठी जीएसटीसह 2 लाख 69 हजार 746 रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 26 हजार 975, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 13 हजार 488 इतका राहील.
कृषिपंपासाठी 7.5 एच.पीची किंमत जीएसटीसह 3 लाख 74 हजार 402 असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 37 हजार 440,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 18 हजार 720 इतका राहील.
पीएम कुसूम- ब योजनेसाठी पात्रता-या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील. 2.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 रोजी घोषित करण्यात आलेल्या धोरणातील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचे वाटप देय राहील.
वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे कुपनलिका, विहीर व नदी इ. ठिकाणी शाश्वत जलस्त्रोत आहेत, याची खात्री महाऊर्जाद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी हा पंप वापरता येणार नाहीत.
अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या योजनेंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु सौर कृषीपंप वाटप न झालेले लाभार्थी या अभियानांतर्गत पात्र राहतील.
ज्या शेतकऱ्यांना 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या सौर कृषीपंपाची आवश्यकता आहे, असे शेतकरी 7.5 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेचा कृषीपंप आस्थापित करु शकतात. परंतु ते 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या सौर कृषिपंपासाठी देय असलेल्या अनुदानास पात्र असतील. उर्वरीत अधिकची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील.
सौर कृषिपंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलरचा वापर करता येईल. मात्र त्यासाठीचा खर्च संबंधित लाभार्थ्यांने करणे आवश्यक असेल.
सौर कृषीपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम-कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करावयाचे आहे. महाऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकारण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. अर्जासाठी महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/.../Kusum-Yojana-Component-B संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. या योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा http://www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट किंवा फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन महाऊर्जा, कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
Comments
Post a Comment