तंत्रनिकेतन प्रवेशासाठी दि. 30 जून पर्यंत मुदतवाढ
अलिबाग : प्रतिनिधी :- विविध तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दि.21 जून 2023 ही अखेरची मुदत होती. मात्र विविध जिल्ह्यांमधून प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे मिळण्यास सर्व्हर डाऊन असल्याकारणाने विलंब होत होता. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत होत्या. या बाबींचा प्रशासकीय स्तरावर विचार होऊन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी सुरू असलेल्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एस.एस.सी.उत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांना आता दि. 30 जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी, कागदपत्राच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची व्यक्तिशः अथवा ई- पडताळणी करणे, अर्ज भरल्याची निश्चिती करणे या बाबी करता येणार आहेत.
तात्पुरती गुणवत्ता यादी दि.3 जुलै 2023 ला जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीवर आक्षेप असल्यास दि. 4 व दि.5 जुलै 2023 ला घेता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी दि.7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी रायगड जिल्ह्यातून 3 हजार 357 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे व त्यातील 2 हजार 495 विद्यार्थ्यांनी अर्जाची निश्चिती पूर्ण केली आहे.
अधिक माहितीकरिता संचालनालयाच्या https//poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन, पेण चे प्राचार्य तथा नोडल अधिकारी डॉ. एन. जी. कुलकर्णी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment