स्थानिक बसस्थानकांची स्वच्छता, सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत
अलिबाग : प्रतिनिधी :- राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि.01 मे 2023 पासून “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राज्यातील 580 बसस्थानकांवर राबविण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार आणि गुणात्मक सेवा देण्याच्या उद्देशाने स्वच्छ बसेस - बसस्थानके, सुंदर बसस्थानक परिसर आणि टापटीप प्रसाधनगृहे या त्रिसूत्रावर आधारित बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करणे यामध्ये अभिप्रेत आहे. यासाठी राज्यातील सर्व बसस्थानकावर स्वखर्चाने स्वच्छता, सुशोभिकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी त्या परिसरातील लघु, मध्यम व मोठे उद्योजक, व्यापारी सहकारी संस्था यांच्याकडे स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागविण्यात येत आहेत.
बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी करणे, विद्युत उपकरणाची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे इत्यादी अनुषंगिक गोष्टी सुव्यवस्थित करणे. बसस्थानकाच्या मुख्य इमारतींची रंगरंगोटी करणे. बसस्थानकाच्या प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती करुन ते स्वच्छ नीटनेटके व निर्जंतूक ठेवण्याच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण, बसस्थानकाच्या प्रत्येक फलाटावर गावांचे मार्गदर्शक फलक व प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचे विहित नमुन्यात तयार करणे. बस स्थानक व परिसराची दैनंदिन स्वच्छता, सुशोभिकरण व सौंदर्यकरण करणे. इतर कामे या सर्व कामांची, देखभाल व दुरुस्ती 1 वर्षांसाठी असेल.
संस्थेचे काम उत्कृष्ट असेल तर आपल्याशी केलेला करार पुढील 2 वर्षांसाठी वाढविण्यात येईल. या बदल्यात बसस्थानकांमध्ये संबंधित संस्थेला त्यांच्या स्वतः च्या उत्पादनाची अथवा सेवेची वर्षभरासाठी जाहिरात प्रसिध्दी व विक्री करण्याची मुभा राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येत आहे.
त्यासाठी पुढील मार्गदर्शक तत्वे अंगिकरण्यात येतील:- सबंधित संस्थेला बसस्थानक परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा ठिकाणी दर्शनी भागात 10x10 फूट आकाराची मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. येथे संबंधित संस्था स्वखर्चाने तात्पुरता स्टॉल उभारुन आपल्या उत्पादन अथवा सेवेची जाहिरात अथवा थेट विक्री करु शकतो. (प्रस्थापित वाणिज्य आस्थापनाच्या हेतूला धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या अटीवर.) वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी बसस्थानक परिसरामध्ये दर्शनी भागात 10x15 फूट आकाराचे होर्डिंग्स स्वखर्चाने उभारुन (संख्या 1) संबंधित कंपनी स्वत: च्या उत्पादनाची अथवा सेवेची जाहिरात करू शकते. बसस्थानकाच्या मुख्य इमारतीमध्ये आपल्या उत्पादन व सेवेची जाहिरात करण्यासाठी प्रवाशी चढ-उताराला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने) 6x3 फूट आकाराच्या कापडी स्टडीज (संख्या 3 ते 5) उभारण्याची मुभा संबंधित कंपनीला देण्यात येईल. बसस्थानकाच्या मुख्य इमारतीवर प्रत्येक फलटावर लावण्यात येणाऱ्या गावाचे मार्गदर्शक फलकावर त्या एकूण फलकाच्या आकाराच्या एक तृतीयांश (1/3) जागेवर संबंधित संस्थेच्या उत्पादन अथवा सेवेची जाहिरात करता येऊ शकेल. बसस्थानकावर प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांच्या नाम फलकांवर एकूण फलकाच्या आकाराच्या 1 पंचमांश (1/5) भागावर संबंधित संस्था आपल्या उत्पादन अथवा सेवेचे नाव लिहू शकते.
कामासोबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे योग्य पालन करणाऱ्या संस्था अथवा उद्योग समूहांना स्थानिक बसस्थानकांची स्वच्छता सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती सूचनेच्या माध्यमातून राज्य परिवहन रायगड विभागातील एक, दोन अथवा सर्व बसस्थानकांसाठी निमंत्रित करण्यात येत आहे. ज्या संस्था अथवा समूहांना यामध्ये स्वारस्य असेल त्यांनी आपला प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये विभाग नियंत्रक, राज्य परिवहन रायगड विभाग पेण, विभागीय कार्यालय रामवाडी बसस्थानकाच्या शेजारी, रामवाडी यांच्याकडे 15 दिवसात सादर करावा. विहित नमुना विभागीय कार्यालय येथे उपलब्ध आहे. त्यातील उत्कृष्ट प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्था अथवा समूहाला पुढील वर्षासाठी नियुक्ती देण्यात येईल, तसेच अंमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, मद्य तत्सम पदार्थाचे उत्पादक व सेवा करणाऱ्या संस्था अथवा कायद्याने जाहिरात करण्यासाठी प्रतिबंधित उत्पादने व सेवा करणाऱ्या समूहाने या स्वारस्य अभिव्यक्ती सूचनेत भाग घेवू नये, असे राज्य परिवहन रायगड विभागाचे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment