मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे- विभागीय आयुक्त सौरभ राव
सोलापूर : प्रतिनिधी : - भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
दिनांक १ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त पुनम मेहता, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, बी.आर माळी, विठ्ठल उदमले, नामदेव टिळेकर, प्रियंका आंबेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी ,कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडीया ॲड. अनिल वासम , इंडीयन नॅशनल काँग्रेस पार्टीचे ॲड .मनिष गडदे इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राव म्हणाले, मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करणे मयत व दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे, नावात दुरुस्ती करण्याची संधी पूननिरीक्षण कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. प्रशासनामार्फत याविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे. राजकीय पक्षांनी सुद्धा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करून तसेच आपल्या स्तरावरून पूननिरीक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे. महाविद्यालय, विद्यापीठातील युवकांच्या मतदार नोंदणीसाठी कॅम्पस ॲम्बेसेडर यांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. मतदार नोंदणीचा व्यापक प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रसार माध्यमे, समाज माध्यमाच्या माध्यमातून युवकांपर्यंत याविषयी माहिती पोहोचवावी. संक्षिप्त पुननिरिक्षण कार्यक्रमातील विशेष मोहीम दरम्यान कार्यवाहीचा आढावा घ्यावा
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मतदारयादी निर्दोष असावी, पात्र मतदारांचे नाव यादीत यावे व अपात्र मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात यावे, यासाठी सध्या सुरू असलेला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण आणि मतदान नोंदणीसंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी बैठका घेत आहेत. या बैठकांना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांनी करून घ्यावी.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श कार्यपद्धती नुसार बदलेल्या मतदान केंद्राची माहिती प्रसिद्ध करावी तसेच याबाबत राजकीय पक्षांना देखील अवगत करावे. ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. जे मतदान केंद्र मतदारांना सोयीस्कर नसेल अशा मतदार केंद्राची पाहणी करून आदर्श कार्यपद्धतीचा अवलंब करून सोयीस्कर असे मतदान केंद्र करण्यात येईल. असेही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा व अकरा विधानसभा मतदार संघ असून,27 ऑक्टोंबर 2023 नुसार जिल्ह्यात 36 लाख 33 हजार 72 इतके मतदार असून यामध्ये 18 लाख 89 हजार 234 पुरुष, तर 17 लाख 43 हजार 579 स्त्री मतदार आणि इतर 259 मतदार आहेत. तर 3 हजार 599 मतदार केंद्र आहेत. मतदार नोंदणी व मतदार जागृतीसाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यात जनजागृती येत आहे. तसेच नव मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे यांनी यावेळी सांगितले.
विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बदललेल्या मतदान केंद्राची माहिती प्रसिद्ध करावी तसेच त्याबाबत राजकीय पक्षांना अवगत करावे. ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी मतदान केंद्रावर अधिकच्या सुविधा उपलब्ध कराव्यात,मतदार केंद्रावर बीएलओ यांचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिध्द करावा अशी मागणी या वेळी केली.
Comments
Post a Comment