इंदापूरमध्ये घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास
माणगाव : सज्जाद डावरे :- माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
दि. ५ डिसेंबर रोजी १ ते १.२० वा. च्या दरम्यान कलानगर, इंदापूर येथील फिर्यादी अंकिता अरुण मांगले यांच्या राहत्या घरात दोन अनोळखी इसमांनी दारावर धक्का मारुन उघडून आत प्रवेश केला. त्यापैकी एक आरोपी तोंडाला पूर्ण कपड्याने झाकलेला व डोळे उघडे ठेवलेला मजबूत बांधा असलेला तसेच दूसरा सढपातळ व साधारण उंचीचा होता. त्यातील एकाने फिर्यादी यांचे अंगावर बसून त्यांचे तोंड दाबून त्यांना तु चुप बैठ असे हिंदीमध्ये बोलून धरून ठेवले. दुसऱ्या आरोपीने कपाट उघडून सोबत आणलेल्या हत्याराने लॉकर तोडून ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन, फिर्यादी यांना त्यांचे घरात डांबून दोघे पळून गेले.
याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५५/२०२३, भा.दं.वि. कलम ३९४, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आस्वर करीत आहेत.
Comments
Post a Comment