पीक नुकसानीचे संवेदनशीलपणे पंचनामे करा

          पालकमंत्री संजय राठोड 

अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आढावा 

वाशिम : प्रतिनिधी :- जिल्हयात २६ ते २९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ज्या पिकांचे नुकसान झाले आहे,त्या पिकांच्या नुकसानीचे संवेदनशीलपणे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

२ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या परिषद कक्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते.यावेळी आमदार ऍड. किरणराव सरनाईक,आमदार धीरज लिंगाडे, आमदार राजेंद्र पाटणी,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,उपविभागीय अधिकारी (वाशिम) वैशाली देवकर, सखाराम मुळे (मंगरूळपीर),ललित वऱ्हाडे ( कारंजा) व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पालकमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले, जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे व्यवस्थित पाठविण्यात यावा.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देता येईल.मागील काळात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊन अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही,त्यांना त्वरित पीक नुकसानीचे पैसे मिळवून देण्यात येईल.यंत्रणांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 श्री. शहा यांनी जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात लागवड केलेल्या पिकांचे क्षेत्रनिहाय माहिती यावेळी दिली.२६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान वाशिम तालुक्यात ४६२ हेक्टर क्षेत्रावर प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले असून त्यापैकी ११७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले. तर रिसोड तालुक्यात ९५ हेक्टर,मालेगाव- ८५ हेक्टर, मंगरूळपीर १७६७ हेक्टर,कारंजा १९१६ हेक्टर व मानोरा ६६५ हेक्टर असे एकूण ४६६५ हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.शहा यांनी यावेळी दिली.सभेला सर्व तहसीलदार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog