झी मराठी निर्मित "जाऊबाई गावात" टिमकडून खोपटे गावात महिलांच्या खेळांना लाभला उदंड प्रतिसाद
उरण (विठ्ठल ममताबादे) :- खोपटे गावच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांनी खोपटे गावातील महिलांकरीता झी मराठी निर्मित "जाऊबाई गावात" या कार्यक्रमाच्या टिम कडून गंमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये खोपटे गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभाग घेतला. महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ जसे की, कांदा फोडणे, लसूण सोलणे, तांदुळातुन खडे निवडणे, खोबरे किसणे, उस तोंडाने सोलणे इत्यादी मजेशीर खेळ झी टीव्ही निर्मित "जाऊबाई गावात" चे प्रतिनिधी रवि प्रधान व त्यांचे सहकारी प्रथम दाभोळकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जमलेल्या महिलांकडून खेळ घेऊन उत्साहाने खेळांत रंगत आणली. महिलांसाठी त्यांच्या रोजनिशीतील कामांचे रूपांतर खेळात झाले आणि खेळ रंगतदार होत गेले. खेळात प्रथम आलेल्या महिलांना "जाऊबाई गावात" च्या टिम कडून पारितोषिकही देण्यात आले. उपस्थित महिलांकरीता भावना कैलास म्हात्रे यांच्या सौजन्याने लकी ड्रॉ काढून तीन महिलांना पैठणी साड्या बक्षीस देण्यात आल्या. या खेळाचे व्यवस्थापन मंगळागौरी व जास्वंदी स्वयंसहायता गटा तर्फे नियोजन करण्यात आले.
Comments
Post a Comment