कोलाड-रोहा कोलाड मार्गांवर बस थांबा नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह, अबालवृद्ध,प्रवाशी वर्ग यांचे अतोनात हाल

 कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):-  कोलाड-रोहा मार्गांवरील कै.दत्ताजीराव ग. तटकरे चौकात बस थांबा नसल्यामुळे ऊन,वारा,पावसात  या मार्गाने प्रवास करणारे विद्यार्थी,अबाल वृद्ध, व इतर प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल होतांना दिसत असुन यामुळे या मार्गानी प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाश्यांना ऊन पावसाचा आधार म्हणून जवळ असणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानात उभे रहावे लागत आहे.

 कोलाड-रोहा मार्गाच्या रुंदीकरणात या मार्गांवर असणाऱ्या बस थांब्याची तोडफोड करण्यात आली. परंतु या रस्त्याचे काम एक वर्षांपूर्वी पुर्ण झाले आहे. परंतु येथे आवश्यक असणाऱ्या बस थांब्याची अद्याप ही उभारणी करण्यात आली नाही यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.

 कोलाड हे ठिकाण प्रवाशाच्या दृष्टीने मध्यस्ती  ठिकाण असुन येथून रोहाकडे जाण्यासाठी या परिसरातील ६५ ते ७० वाडया, वस्त्या,खेडेगावातील नागरिक प्रवास करीत असतात. शिवाय कोलाड येथे कै.द.ग. तटकरे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज असल्यामुळे येथे रोहा पासुन असंख्य विद्यार्थी येजा करीत असतात परंतु येथे बस थांबा नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय निर्माण झाली आहे.

 विद्यार्थ्यांना कमी दरात मिळणारा एसटी पास, महिलांना एसटीचा अर्धा तिकीट,जेष्ठ नागरिकांना एसटी भाडयात मिळणारी सवलत यामुळे हे सर्व प्रवाशी एसटीने प्रवास करीत असतात मग एसटीला कितीही उशीर झाला तरी ते एसटीची वाट बघत व्यावसायिकांच्या दुकानात उभे राहत असुन अशा वेळी एसटी आली तर सर्व विद्यार्थी एसटी पकडण्यासाठी मागे पुढे न बघता धावत सुटतात यामुळे मागुन येणाऱ्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊ शकतो यामुळे संबंधित प्रशासन यांनी तातडीने लक्ष देऊन बस थांबा बांधण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog