जिल्ह्यातील 1 लाख 70 हजार महिलांनी आमिषाला बळी न पडता मतदान करण्याची घेतली शपथ
मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा
नागपूर : प्रतिनिधी :- सक्षम लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग याला अनन्य साधारण महत्त्व आहे. मतदान प्रक्रियेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण व उत्स्फूर्त सहभाग वाढावा यादृष्टीने स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी आज संपूर्ण जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी विशेष मोहीम घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 70 हजार महिलांनी लोकशाहीला सशक्त व सक्षम करण्यासाठी भयमुक्त व शांततापूर्ण वातावरण जपून मतदानाचे पावित्र राखून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत निहाय तर शहर व महानगरासाठी नगर परिषद, महानगरपालिकामार्फत वार्डनिहाय नियोजन केले होते. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 41 गावांमधून या मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. 15 हजार 126 बचत गटांमार्फत मतदान प्रक्रियेत महिलांच्या सहभागावर भर देण्यात आला. 1 हजार 729अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी मतदानाचे प्रमाण वाढावे व विशेष करुन कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाला पुढे यावे यादृष्टीने मतदार साक्षरतेत सहभाग घेतला.
लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा आहे. प्रत्येक महिलेला मिळालेल्या मतदानाच्या हक्काचे पालन करता यावे यासाठी संधी मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचित राहता कामा नये यादृष्टीने स्वीप अंतर्गत आम्ही नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात मतदारांच्या साक्षरतेवर आम्ही अधिक भर देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले.
Comments
Post a Comment