आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत
: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रधुनाथ गावडे
परभणी : प्रतिनिधी : - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने कालपासून आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मतदार संघात कुठेही आचारसंहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत नोडल अधिकारी व विभागप्रमुखांच्या बैठकीत श्री. गावडे बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, जालना जिल्ह्याचे अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक नोडल अधिकारी आणि विभागप्रमुखांनी निवडणूक कालावधीत सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अमंलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व भरारी पथकांचा प्रभावीपणे वापर करावा. एसएसटी, एफएसटी भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करुन कार्यवाही सुरु करावी. आदर्श आचारसंहितेची अमंलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सर्व नोडल अधिकारी तसेच विभाग प्रमुखांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदर्श आचारसंहिता नियमांचा अभ्यास करुन योग्य कार्यवाही करावी.
तसेच मनपा, नगर परिषद, गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व बॅनर, होर्डींग्जवरील संदेश, पोस्टर, झेंडे, पताका त्वरीत काढून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रभागाची पाहणी करून नव्याने, फलक लावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच शासकीय कार्यालयातील कोनशिला व्यवस्थितरित्या झाकाव्यात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व एसटी बसेसवर लावण्यात आलेल्या राजकीय जाहिराती तातडीने काढून टाकावेत. कोणत्याही नवीन कामांची प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेश, प्रशासकीय मान्यता देण्यात येवू नये. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राजकीय व्यक्तींसोबत बैठका आयोजित करु नये. तसेच राजकीय रॅलीत सहभागी होवू नये. जिल्हा प्रशासनातील शासकीय विभागांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणूक कामकाजाकरीता त्यांच्या अधिनस्त शासकीय वाहने तातडीने जमा करण्याचे निर्देश श्री. गावडे यांनी यावेळी दिले.
तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून ते सुस्थितीत आणि आवश्यक त्या सर्व पायाभूत सूविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून जबाबदारीने काम करावे, आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करीत असताना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच काही प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीतांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी.
यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गावडे यांनी सर्व नोडल अधिकारी यांनी केलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस यावेळी सर्व नोडल अधिकारी आणि विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment