चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता

कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

रायगड : प्रतिनिधी :- ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा 97 वा वर्धापन दि.20 मार्चला महाड येथे साजरा होत आहे. यानिमित्ताने शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. सर्व शासकीय यंत्रणाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी महाड ज्ञानोबा बानापुरे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्‍तंभ, स्‍मारक परिसराची साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विविध ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करावे. तसेच क्रांती स्‍तंभ परिसरात 50 मोबाईल शौचालये, 30 स्नानगृहे उभारण्यात यावेत. तसेच महाड ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत रुग्णवाहिका तसेच पुरेसा औषध साठा व आरोग्य पथक तैनात राहील याची दक्षता घ्यावी. याबरोबरच अखंडित वीजपुरवठा तर अनुयायींची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी दिल्या.

या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी.  एसटी महामंडळाच्या वतीने 19 ते 21 मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्‍थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था केली जाणार आहे. या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या अनुयायी यांना पिण्याचे पाणी, सावली साठी मंडप तसेच संपूर्ण परिसरात दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत. तसेच चौकात त्याची माहिती देणारी चित्रफित बनवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अनुयायी यांना देण्यात येणाऱ्या अल्पोपाहाराची दर्जा राखावा तसेच देण्यात येणाऱ्या फूड पॅकेटची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनुयायांची संख्या लक्षात घेता कुठलीही गैरसोय होणार नाही याची सर्व शासकीय विभागानी दक्षता घेऊन नियोजन करावे असेही श्री.जावळे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog