मतदारांच्या जाणीव जागृतीत शिक्षकांची भुमिका महत्त्वाची - जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी :- देशाची भावी पिढी घडवण्यामध्ये शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते. मतदारांमध्ये मतदानासाठीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भुमिका महत्त्वाची असते व ते काम शिक्षकांनी चोखपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची आढावा बैठक आज वंदे मातरम सभागृहांमध्ये घेण्यात आली. स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जाणीव जागृतीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शिक्षणाधिकारी (माध्य)एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथ)जयश्री चव्हाण, मनपा उपायुक्त पांढरे, ‘स्वीप’ नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती भूमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, जिल्ह्यात गेल्या निवडणूकीला मतदानाची टक्केवारी कमी होती. हे प्रमाण वाढायला हवे. मतदारांमध्ये मतदानासाठी जाणीव जागृती निर्माण करावी लागेल. प्रत्येक घरापर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांपेक्षा योग्य व्यक्ति नाही. त्यामुळे शिक्षक,मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन. प्रत्येक व्यक्ती संस्था, शाळा, आणि विद्यार्थी- पालक यांनी या लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हावे व लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
मतदानाबाबत नकारात्मकता सोडून मतदानासाठी दिलेल्या शासकीय सुटीचा वापर मतदानासाठीच करावा. मतदाराला मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शिक्षकांनी आपल्यातील विविध कलागुणांचा उपयोग स्वीप उपक्रमांसाठी करुन द्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
Comments
Post a Comment