आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेताच्या बांधावर मतदान जागृती
पुणे : प्रतिनिधी : - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत तहसीलदार संजय नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघातील स्वीप पथक मतदान जनजागृतीसाठी धामणी गावात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासोबत त्यांनी मतदान प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास समन्वय अधिकारी सविता माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणीच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले, शिक्षक वृंद, स्वीप पथकातील सदस्य आदी उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात वाडी-वस्त्यांवर जावून मतदार जागृती करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्रवारील सुविधा याबाबत माहिती देण्यात येत आहे. मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी अभिनव कल्पनांचा वापर कर्मचारी करीत आहेत. बस थांबा, आठवडे बाजार, गर्दीची ठिकाणे याठिकाणीदेखील फलक घेवून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.
स्वीप पथकाद्वारे धामणी गावातून मतदान जनजागृती रॅली व शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी शंभर टक्के मतदान करण्याची विनंती करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून मतदान जनजागृती संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
लोणी आठवडे बाजारात नागरिकांची भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वयोवृद्ध नागरिकांसाठी मतदान केंद्रावर असणाऱ्या सुविधांची त्यांना माहिती देण्यात आली. मतदानाचे आवाहन करणारे फलक कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रदर्शित केले. पेठ येथील महिला बचत गटाच्या महिलांनाही मतदान करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातही जनजागृती
पिंपरी विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत विद्यालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील सदस्यांनी न चुकता मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली.
Comments
Post a Comment