रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू

रायगड लोकसभा मतदार संघांसाठी दि. 7 मे रोजी मतदान

रायगड : प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48  लोकसभा मतदारसंघ असून 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात दि 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल पासून सुरु होईल. जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

32- रायगड लोकसभा मतदार संघाची तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.


 शुक्रवार 12 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल आहे.

 नामनिर्देशन पत्राची छाननी 20 एप्रिल रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल आहे.

मतदान 7 मे होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी 6 जून पर्यंत आहे.

 रायगड जिल्ह्यात एकूण 2 हजार 694 मतदान केंद्र असून रायगड लोकसभा मतदार संघत 2 हजार 185 मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध आहे. एकूण 27 हजार कर्मचारी असून प्रत्यक्ष कामकाजसाठी 13 हजार 470 मनुष्यबळ आवश्यक आहे. 

मतदार संघाचे एकूण मतदार

रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, हे रायगड जिल्ह्यातील तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे लोकसभा मतदार संघ आहेत.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, आणि उरण हे विधानसभा मतदार संघ 33- मावळ लोकसभा मतदार संघात आहेत.

रायगड मतदार संघात एकूण 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8लाख 13 हजार 515 मतदार तर महिला 8 लाख 40 हजार 416 मतदार तर तृतीय पंथी 4 आहेत. तर दिव्यांग 8 हजार 46 तर 18 -19 वयोगटातील 16हजार 288 मतदार आहेत. तर 85 पेक्षा अधिक वयोगटातील 31 हजार 28 मतदार आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी विविध ऍप

तक्रार करण्यासाठी स्वतंत्र ऍप 

या निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.

मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना Know Your Candidate (KYC-ECI) या ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज

स्वतंत्र आणि निशपक्ष निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुक कर्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 22 समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog