जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे
‘राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण’ महिन्याचा शुभारंभ संपन्न
रायगड : प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग डॉ.अंबादास देवमाने यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिन्याचा ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक जन्म दोष दिन पाळला जातो व मार्च महिना हा राष्ट्रीय जन्म दोष जनजागरण महिना म्हणून साजरा केला जातो. यामध्ये सर्व जन्म दोषाबद्दल जागरूकता आणि काळजीसह उपचार पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षीची थीम “Breaking barriers- inclusive support for children with birth defect” अशी आहे.
जगभरात दरवर्षी सहा टक्के बालक जन्मतःच दोष घेऊन जन्माला येतात. जन्म दोष हा अनुवांशिक जसे मातेचा मधुमेह आणि लट्ठपणा, मातेचे वय, व्हायरल इन्फेक्शन आणि मातृ स्थिती जसे कांजिण्या, रुबेला, झिका, पर्यावरणीय आणि औषधे यांच्याशी संबंधित असतो. आपल्या भावी पिढीवर जन्मजात दोषांचा काय परिणाम होतो याची जाणीव असल्याने केंद्रीय मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिना मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिन्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील इतर आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचेकरिता डॉ.सागर खेदू, एसएनसीयु बालरोग तज्ञ यांनी जन्मजात व्यंग ओळखणे बाबतचे प्रशिक्षण घेतले, यामध्ये त्यांनी क्लब फूट, हृयरोग आजार, स्नायू विकृती, डाऊन सिंड्रोम, फाटलेले ओठ व टाळू, जन्मजात बहिरेपणा व जन्मजात मोतीबिंदू असे जन्मजात व्यंग कसे ओळखावे याबाबत वेबिनारद्वारे प्रशिक्षण दिले.
या मोहिमे दरम्यान जिल्हयातील सर्व शासकीय प्रसूती गृहामध्ये, आशा द्वारे गृहभेटी दरम्यान नवजात बालकामध्ये, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत अंगणवाडी व शाळांमध्ये जन्म दोष शोधण्यासाठी तपासणी केली जाणार आहे. मोहिमेदरम्यान जन्म दोष आढळून आलेल्या बालकांना जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामध्ये संदर्भित करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग डॉ.अंबादास देवमाने यांनी सूचना दिल्या.
राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिन्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाकरिता डॉ.सागर खेदू, एसएनसीयु बालरोग तज्ञ , अधिसेविका श्रीमती गायत्री म्हात्रे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती नंदिनी चव्हाण, एसएनसीयु परीसेविका व अधिपरिचारिका, प्रसूती गृहातील परिसेविका, आरबीएसके समन्वयक श्री.सुनिल चव्हाण, डीईआयसी व्यवस्थापक श्री.गणेश भोसले तसेच आरबीएसके व डीईआयसी चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment