97-गंगाखेड मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त 

आणि दिव्यांग मतदारांच्या गृह मतदानास सुरुवात

: सहायक निवडणुक निर्णय अधिकारी जीवराज डापकर

परभणी : प्रतिनिधी :-   17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदार संघातील निवडणूक यंत्रणा 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांची घरोघरी जावून मतदान नोंदविण्याची प्रक्रिया गंगाखेड विधानसभा मतदार संघात सुरुवात झाली आहे. भारत निवडणूक विभागाने सुरु केलेल्या या सुविधेमुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे. 97-गंगाखेड मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त आणि दिव्यांग मतदारांच्या गृह मतदानास सुरुवात झाल्याची माहिती 97-गंगाखेड विधानसभा संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे.

देशातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर 17-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता 97-गंगाखेड विधानसभा संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनात आजपासून (दि.18) गंगाखेड विधानसभा मतदार संघात गृह मतदानाला सुरूवात झाली. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील 161 ज्येष्ठ तर 34 दिव्यांग आपला मतदाना हक्क घरातून बजावणार असल्याची माहिती 97-गंगाखेड विधानसभा संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली. 

‘मी दिव्यांग असुल स्वत:च्या पायावर उभे राहणे मला शक्य होत नाही. त्यामुळे मतदान केंद्रावर जावून मतदान करणे मला  अशक्य होते. परंतू आज जिल्हा प्रशासनातील निवडणूक कर्मचाऱ्यांनी माझ्या घरी येऊन माझे मत नोंदविले, यामुळे मला माझा मतदाना हक्क बजावता आला’ अशा भावना गंगाखेड तालूक्यातील ढवळकेवाडी येथील ज्ञानेश्वर रोहिदास राठोड या दिव्यांग मतदाराने व्यक्त केल्या.

‘वय जास्त झाल्याने आता शारिरीक मर्यादा येत आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर जावून मतदानासाठी जाता येत नाही. परंतू निवडणूक विभागाचे लोक माझ्या घरी येूवन, माझे मतदान करुन घेतलं, याचा आनंद झाला’, असे मत गंगाखेड तालूक्यातील पिंपळदरी येथील दगडोबा बाबूराव मुंडे यांनी व्यक्त केले. 

भारत निवडणूक आयोगाने गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयतेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गृह मतदानाच्या फॉर्म 13-ए (डिक्लरेशन), फॉर्म 13-बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13-सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13-डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. मतदार मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हता याची काळजी घेण्यात आली. मतपत्रिकेची घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत सुरक्षीत जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

Comments

Popular posts from this blog