पनवेल येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट
रायगड : प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे आज पनवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले. जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांनी वितरण केंद्राला भेट देवून प्रक्रियेची पाहणी केली.
रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांसाठी मतदान यंत्र वितरण होणार आहे. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी. वितरणाचे कामकाज अचूक करावे, यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे. ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी दिले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यंत्र स्वीकारण्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र योग्य ठिकाणी जावे म्हणून मतदारसंघनिहाय विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वितरणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून या कक्षात विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आज पहिल्या दिवसाची सुरूवात कंट्रोल युनिटच्या वितरणाने करण्यात आली.
जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकियेनंतर प्राप्त यादीनुसार वितरण कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट शोधून त्यांची संबंधित मतदारसंघाला वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यात येत आहे. वितरणासंदर्भातील मदतीकरीता स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. वितरीत केले यंत्र जीपीएस यंत्र असलेल्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुम नेण्यात येतील, अशी माहिती रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment