नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी वेळेचे पालन करणे आवश्यक
: जिल्हाधिकारी जलज शर्मा
- राजकीय पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्या समवेत घेतली बैठक
- नामनिर्देशन पत्र भरणेकामी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची दिली माहिती
नाशिक : प्रतिनिधी :- लोकसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २६ एप्रिल पासून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज राजकीय पदाधिकारी, प्रतिनिधी यांची बैठक घेऊन नामनिर्देशन पत्र भरणेकामी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात दि. 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येणार असून त्यासाठी संबंधित उमेदवारांनी वेळेचे पालन करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यानी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, निवडणूक शाखेचे तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार राजेश अहिरे यांच्यासह संबंधित राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहेत. नामनिर्देशन पत्र सादर करतांना उमेदवारांनी विहित नमुन्यातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून ज्या रकान्यातील माहिती उमेदवाराशी संबंधित नसेल त्याठिकाणी लागू नाही असे लिहावे. तसेच 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी, नाशिक हे असून 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहेत. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात 100 मीटरच्या आत उमेदवारासह एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी येतांना तीनपेक्षा जास्त वाहने 100 मीटर परिसराच्या आत आणता येणार नाही. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी आणण्यात येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबींवर होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत उपस्थित पदाधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना नामनिर्देशनपत्राबाबत असलेल्या शंकांचे निरसन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment