हवामान विभागाचा उष्णतेच्या लाटांचा इशारा

मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा ठेवाव्यात

- जिल्हाधिकारी अजित कुंभार  

अकोला : प्रतिनिधी :-  एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणा-या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा ठेवाव्यात, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. 

मतदार, विशेषत: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तसेच निवडणूक कर्मचा-यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेही याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रांवर आवश्यक सुविधा व मार्गदर्शक तत्वांचे पालन होण्याची खातरजमा करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिका-यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत. 

निवडणूक कालावधीत उष्मा लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मतदान केंद्रावर पंखा, कुलर, तापमान नियंत्रणासाठी आवश्यक साधने, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सहाय्य, पेयजल, आरो्ग्य पथक आदी सुविधा असाव्यात. निवडणूक कर्मचा-यांना उष्णतेबाबत घ्यावयाची दक्षता, उपचार आदी प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे. ओआरएसचा वापर करून शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखावे. मोकळे व हलके कपडे वापरावेत. उष्माघात झालेल्या व्यक्तीला सावलीत थंड जागेत आणून त्याचे शरीर ओल्या कापडाने पुसून शरीराचे तापमान कमी करण्याचा सतत प्रयत्न करावा. नजिकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog