निवडणूक तयारीचा निरीक्षकांकडून आढावा
सतर्क राहून काटेकोर कार्यवाही करावी
- सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन
अकोला : प्रतिनिधी :- मतदानाची तारीख चार दिवसांवर आली असून, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्देशाचे व नियमाचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सामान्य निवडणूक निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी आज येथे दिले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 06- अकोला लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा, तसेच उमेदवारांच्या खर्चाचा आढावा आज निवडणूक निरीक्षकांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे घेतला. पोलीस ऑब्झर्वर पी.आर. वेनमत्ती, खर्च निरीक्षक बी जोतीकिरण यांच्यासह जिल्हाधिकारी अजित कुंभार, स्वीप नोडल अधिकारी बी. वैष्णवी, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला चार दिवस राहिले आहेत. त्यानुषंगाने यंत्रणांनी काटेकोर कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. जाडोन यांनी दिले. यावेळी निवडणूक प्रक्रियेमधील प्रत्येक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. निरीक्षकांनी खर्चाची व उमेदवारांच्या बँक खात्यांची माहिती घेतली. उमेदवारांच्या फॉर्मबाबतही आढावा घेण्यात आला.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती निरीक्षकांनी घेतली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच उन्हापासून बचाव होण्यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था असावी. कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, आदी निर्देश यावेळी देण्यात आले.
Comments
Post a Comment