कोलाड नाक्यावर रूग्णवाहिका बंद पडल्याने रिक्षाचालकांच्या मदतीमुळे गंभीर अवस्थेतील रूग्णाचे प्राण वाचले
भाई सानप व त्यांच्या सहकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी
कोलाड (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड नाक्यावर रूग्णवाहिका बंद पडल्याने येथील रिक्षाचालक निलेश सानप उर्फ भाई सानप, विजय बागूल, विकास बागूल, संदीप खामकर, यांच्यासह रिक्षा-मिनीडोअर चालकांनी विशेष दक्षता घेऊन दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे गंभीर अवस्थेतील रूग्णावर योग्य वेळी उपचार होऊन रूग्णाचे प्राण वाचले. 'माणूसकी हाच खरा धर्म आहे' हे येथील रिक्षा-मिनीडोअर चालकांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याने त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
एक गंभीर अवस्थेतील रुग्ण रत्नागिरीहून मुंबईला घेऊन जात असताना रुग्णवाहिका कोलाड जवळ तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडली. त्यावेळी रूग्णाच्या कुटूंबियांनी तात्काळ १०८ आपत्कालीन सेवेला फोन केला, परंतु त्यांच्याकडून कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. अत्यवस्थ रुग्णाला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक होते. मात्र त्याच वेळी कोलाडमधील एका रिक्षाचालकाने रूग्णाच्या कुटूंबियांची धावपळ पाहून त्यांची चौकशी केली. त्याने तात्काळ निलेश सानप उर्फ भाई सानप यांच्याशी संपर्क साधून त्यांना जवळच्या रिक्षा स्टँडवर बोलावून घेतले. त्यांचे भेटणे म्हणजे देवदूतासारखेच होते. त्यांनी परिस्थिती समजताच त्वरित फोनाफोनी सुरू केली. अवघ्या १० मिनिटांत खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णवाहिका मागविण्यात आली. परंतु ती रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलिंडरशिवाय होती, त्यामुळे लगेचच ऑक्सिजन सुविधा असलेली दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. भाई सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणताही जात-धर्म न पाहता, उदार मनाने केलेल्या मदतीमुळे रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवून त्याच्यावर उपचार सुरू करता आले. त्यांच्या तत्परतेमुळेच रूग्णाचे प्राण वाचले. रिक्षाचालकांनी योग्य वेळी मदत करून रूग्णाचे प्राण वाचविल्यामुळे खेड येथील अताउल्लाह तिसेकर यांनी भाई सानप व त्यांचे सहकारी रिक्षाचालक यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment