रोह्यात गांजा आणि गावठी दारू माफियांवर कारवाईचा बडगा.
निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची छापेमारी.
रोहा : प्रतिनिधी :- रोहे शहरात व ग्रामीण भागात गेली सातत्याने बेकायदेशीर अंमली पदार्थाची आणि गावठी दारूची खुलेआम विक्री होत असून या माफियांवर कायदेशीर कारवाईची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रोहा पोलिसांनी बेकायदेशीर धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गावठी दारूच्या भट्ट्या, अवैधरित्या दारूधंदा करणारे चायनीज सेंटर आणि अंमली पदार्थ विक्री करण्याऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. शहरातील एका २४ वर्षीय तरुणा विरोधात गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक आहे. अरबाज अहमद बडे ( रा. रोहा खालचा मोहल्ला ) असे आरोपी तरुणाचे नाव असून बुधवारी ( ता.२३) रोजी दुपारी ४:४५ वा. च्या सुमारास खालचा मोहल्ला येथे राहत्या घरी पोलिसांनी छापा मारला असता आरोपी तरुणाकडे ८५०० रुपये किंमतीचा गांजा व नशाकारक अंमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी सदर अंमली पदार्थ जप्त केला असून अरबाज बडे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
तसेच रोहे तालुक्यातील झापडी गावातील जंगल भागात आणि धाटाव गणातील कारिवणे गाव जंगलात गावठी दारूच्या भट्ट्या खुलेआम व दिवसाढवळ्या पेटविल्या जातात व गावठी दारू कारखाण्यात लाखो रुपये किंमतीच्या दारूची निर्मिती व विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे बेकायदेशीर धंदे उध्वस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र सुरू केली. या मोहिमेत प्रथम झापडी गावातील जंगल भागात ६३ हजार रु. किंमतीचे काळा गूळमिश्रित रसायन भरलेल्या ९ टाक्या व ३५०० रु. किंमतीचे ड्रम भरलेली दारू जप्त करून जागीस नष्ट करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून संगीता कोंडीराम गोरे या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तदनंतर धाटाव परिसरात असलेल्या कारविणे या जंगल भागात पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गावठी दारूचा कारखाना उध्वस्त केला. या प्रकरणी प्रकाश रामा कोकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पोलीसांनी अमली पदार्थ आणि गावठी दारू धंद्या विरोधात केलेल्या दमदार कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment