शिरूर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
पुणे : प्रतिनिधी :- "आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु", अशी शपथ शिरूर विधानसभा मतदारसंघातील तळेगाव ढमढेरे आणि वाघोली ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थांनी घेतली.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी याठिकाणी मतदान जनजागृती पथकाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव ढमढेरे तसेच वाघोली ग्रामपंचायत येथे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी स्वीपपथकासमवेत तळेगाव मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभाग सेविका उपस्थित होत्या. तसेच मतदार संघातील शासकीय व निमशासकीय यंत्रणातील प्रमुख अधिकारी व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याकडून मतदान करण्यासाठी आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करुन मतदानाचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी १०० टक्के मतदान करणार असल्याचा संकल्प केला.
Comments
Post a Comment