सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा : प्रतिनिधी :- सैनिकांच्या बलीदानामुळेच आपल्या देशासह आपले कुटुंब सुरक्षित आहेत. सैनिकांबाबत संवेदनशिल आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, लोकसंख्येच्या आधारवर जमिनी खूप कमी आहेत. ज्या जमिनी माजी सैनिकांनी पसंत केल्या आहेत त्या शासकीय जागा विविध प्रकल्पांना देण्यात आलेल्या आहेत. अनेक काळापासून प्रलंबित असणारा सैनिकांच्या जागेच्या प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा यासाठी सैनिकांचा निवासी पत्ता लक्षात घेऊन तेथून जवळपासच्या जागा यंत्रणेने उपलब्ध कराव्यात अशा सूचना यंत्रणेला दिल्याचे जिल्हाधिकारी डुडी यावेळी म्हणाले. पण उपलब्ध असणाऱ्या जागा सैनिकांनीही मान्य कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, मी ज्या जिल्ह्यातून आहे त्या जिल्ह्यातून देशात सर्वात जास्त सैनिक असणारा जिल्हा आहे. तसेच सातारा जिल्ह्याचा लौकिकही देशपातळीवर सैनिकांचा जिल्हा असा आहे. जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहेत. सातारा जिल्ह्यात काम करीत असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे सैनिकांबाबत संवेदनशिल आहे, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट आणि त्यांच्या कुटुंबाकडील अडीअडचणी या सर्वांची जाणीव आहे.
सैनिक हे सिमेचे रक्षण करीत असतात त्यांच्या कुटुंबीयांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात. कोणीतरी त्यांच्या जमिनीवर हक्क सांगतो अशा प्रकरणांमध्ये सैनिकांच्या कुटुंबीयांनी माझी थेट भेट घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत व्हॉटसअ्प ग्रुप व टेलीग्राम ग्रुप तयार करावा. काही प्रलंबित प्रश्न असतील ते त्यावर मांडावेत. सैनिकांचे कुटुंबीय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय समन्वयाने त्यांच्या समस्या सोडवतील. सैनिकांचे पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपले ध्येय साध्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांचा उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलनाबाबत सत्कार करण्यात आला. सतेश हंगे यांनी सैनिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती दिली.
वीर माता, वीर पत्नी, इयत्ता 10 वी 12 मध्ये 90 टक्क्याहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळावलेल्या सैनिकांच्या पाल्यांच्या जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, माजी सैनिक, सैनिकांचे कुटुंबीय विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment