बचत गटांच्या योगदानातून साकारले ‘तेजस्विनी भवन’
अकोला : प्रतिनिधी : - महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटांतील महिलांच्या योगदानातून अकोला येथे ‘तेजस्विनी भवन’ साकारण्यात आले असून, या वास्तूचे दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 वाजता उद्घाटन होणार आहे.
बचत गटांच्या माध्यमांतून खेडोपाडी विविध व्यवसाय करणा-या महिलीभगिनींच्या कष्ट व योगदानातून शहरातील डाबकी रस्त्यावरील उगलेवाडीत ही वास्तू उभी राहिली आहे. तेजस्विनीभवनाची वास्तू दोनमजली असून, त्यात कार्यालय, प्रशिक्षण सभागृह, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी सुविधा आहेत. बचत गटाच्या चळवळीतील हा महत्वाचा टप्पा आहे, असे ‘माविम’च्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी सांगितले.
अकोला तालुका लोकसंचालित साधन केंद्रातर्फे 1 हजार 600 बचत गट व सुमारे 17 हजार 500 महिला संघटक कार्यरत आहेत. या सर्व महिलांना उद्योग- व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे अकोला तालुक्यात गावोगाव अनेक छोटे व्यवसाय सुरू झाले. आता तेजस्विनीभवन निर्माण झाल्यामुळे गटांना उत्तम प्रशिक्षणासाठी सभागृहाची सुविधा उपलब्ध झाली आहे, असे लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सोनाली अंबरते यांनी सांगितले. ही वास्तू तीन हजार 100 फुटांच्या क्षेत्रात सुमारे 65 लक्ष रू. निधीतून उभारण्यात आली आहे.
Comments
Post a Comment