अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता
रायगड जिल्ह्यासाठी 1.14 कोटींचे अनुदान मंजूर
रायगड : प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यात महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दि. 01 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांचे अर्ज नारी शक्ती दूत अॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टल वरून भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना देण्यात आली होती. यानुसार रायगड जिल्ह्यासाठी रु.1 कोटी 14 लाख 83 हजार 900 इतके अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रायगड-अलिबाग सुहिता ओव्हाळ यांनी दिली आहे.
आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना एकूण रु.1,14,83,900 (अक्षरी एक कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे) रुपयांचे प्रोत्साहन भत्त्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविका यांनी नारी शक्ती दूत अॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टल वर यशस्वीपणे नोंदवलेल्या 2 लाख 29 हाजर 184 अर्जांवर आधारित रु.50 प्रति अर्ज प्रमाणे रु.1,14,59,200/- अनुदान मंजूर. मुख्य सेविकांनी नोंदवलेल्या 494 अर्जांवर आधारित रु.50 प्रति अर्ज प्रमाणे रु.24,700 अनुदान मंजूर.
हे अनुदान तालुकानिहाय बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/नागरी) यांच्या डीडीओ खात्यावर वर्ग करण्यात आले असून, जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांच्या खात्यावर हे भत्ते वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.
Comments
Post a Comment