जिल्ह्यात २० व २१ मार्चला "ग्रंथोत्सव २०२४" होणार साजरा
अलिबाग : प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात दि. २० व २१ मार्च रोजी "ग्रंथोत्सव २०२४" चे आयोजन महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, पेण येथे करण्यात आले आहे.
यामध्ये ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री आयोजित करण्यात आली असून, सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत वाचकांसाठी खुली असेल. या प्रदर्शनात मराठी व इंग्रजी भाषेतील कथा, कादंबऱ्या, चरित्रे, शासकीय प्रकाशने आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ उपलब्ध असतील.
ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन गुरुवार, २० मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असून यावेळी लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्यातील नामवंत साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९.३० वा. ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
दुपारी २.३० ते ४ वा. "शब्द आमच्या सोबतीला..." या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात विविध क्षेत्रातील लेखक सहभागी होणार असून, ग्रंथप्रेमींसाठी हा एक प्रेरणादायी सत्र ठरणार आहे. दुपारी ४ ते ५.३० वा. "रंजक प्रवास - आपल्या, माय मराठीचा" इये मराठीचिये नगरी... हा कार्यक्रम
सार्वजनिक वाचनालय, दिवेआगार, ता. श्रीवर्धन, संकल्पना, शर्मिला करमकर सादर करणार आहेत.
संध्याकाळी ५.३० ते ६ या वेळेत "भारताचे संविधान" आधारित पटनाट्य सादर होणार आहे. सादरकर्त्या आदिवासी मुलांची शासकीय वसतिगृह देवनगरी पेण.
शुक्रवार, २१ मार्च रोजी स. ११ वा. “मराठी वृत्तपत्रातील शब्दांचे सामर्थ्य” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात अनेक नामवंत साहित्यिक आणि लेखक सहभागी होणार आहेत.
दुपारी १२.३० ते १ वा. रायगड जिल्ह्यातील जिल्हा व तालुका वर्ग ग्रंथालयातील उत्कृष्ट वाचकांचा सत्कार समारंभ.
तर दुपारी २ ते ३ वा. “सार्वजनिक ग्रंथालये, एक संस्था” या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यात ग्रंथालयाच्या महत्त्वावर चर्चा केली जाणार आहे.
दु. ३ ते ४ वा. “गजल व कविता, एक काव्यअनुभव” या विषयावर परिसंवाद होणार असून, यात अनेक प्रसिद्ध कवी सहभागी होणार आहेत.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि नागरिकांनी ग्रंथांप्रती प्रेम वाढवावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रंथप्रेमी, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अजित पवार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment