शेळ्यांच्या आखराला आग. 26 शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी.
रोहा : प्रतिनिधी :- रोहा तालुक्यातील शेडसई गावातील शेळ्यांच्या आखराला (गोठ्याला) अचानक आग लागून 26 शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. शनिवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली. यात वामन काशिनाथ मालप यांच्या 26 शेळ्या जळून मरण पावल्या. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
रोहा चणेरा मार्गावरील शेडसई गावातील शेतकरी असलेले वामन काशिनाथ मालप शेळ्या पाळून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीच्या कौलारू वाड्याला शनिवारी पहाटे ३ वा. च्या सुमारास अचानक आग लागली. या दरम्यान चणेरा परिसरातील चाकरमानी पहाटेच्या रेल्वेने मुंबईला रवाना होण्यासाठी निघाले असताना त्यांना सदर वाड्याला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शेडसई गावातील नागरिकांना ओरडून जागे केले. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व तत्परतेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात येत नसल्याने रोहा-धाटाव येथील अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत वामन मालप यांचा वाड्यासहित 26 शेळ्या आगीत जळून खाक झाल्या होत्या. वेळीच नागरिकांना आगीची माहिती मिळाल्याने शेजारच्या वाड्यांचा बचाव झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि कृषी अधिकारी यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व पिडीत कुटूंबाची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थवर्गातून होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांचा विमा काढणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Comments
Post a Comment