पिंप्री राजा येथे कन्या दिन उत्साहात साजरा
मुलींच्या जन्माचे स्वागत करा-जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी :- पिंप्री राजा ग्रामपंचायत येथे कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि बाल विवाहाला विरोध करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.
मुलींच्या जन्मदराचे प्रमाण संतुलित राहावे आणि बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानेजिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी नव वर्षाचे औचित्य साधून जिल्हाभरात हा उपक्रमप्रत्येक ग्रामपंचायतीत राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन पिंप्री राजा ग्रामपंचायत आवारात करण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सरपंच श्रीमती वैशाली पवार, उपसरपंच मोहसीन सय्यद, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी मीना रावताळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावरगावकर, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना डॉ. विशाल बेंद्रे यांनी ग्रामीण भागात मुलींच्या जन्मदराच्या घटत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. तसेच पी सी पी एन डी टी कायद्याच्या तरतूदीविषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आणि त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करण्याचे आवाहन केले. तसेच बालविवाह आणि गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.मालमत्ता जमवत असतांना पर्यावरण रक्षण, जल व मृद संवर्धन आणि स्वच्छता यासारख्या शाश्वत गोष्टींवर ही काम करावे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांना बालविवाह आणि गर्भलिंग निदान चाचणीस विरोध करण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेवटी गटविकास अधिकारी मीना रावताळे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment